Majha Gav Majha Shahr

*लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयात १६ वे श्रावणी कवी संमेलन उत्साहात संपन्न*

मोखाडा / सचिन वझरे माझं गावं माझं शहर वृत्तसेवा

रयत शिक्षण संस्थेचे लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मोखाडा येथे १६ वे श्रावणी कवी संमेलन मोठ्या उत्साहात व काव्यमय वातावरणात संपन्न झाले. या कवी संमेलनास विविध क्षेत्रांतील मान्यवर कवी, पत्रकार, साहित्यिक तसेच साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा. आर. डी. घाटाळ यांनी केले. यावेळी त्यांनी श्रावणी कवी संमेलनाची परंपरा, उद्दिष्टे आणि साहित्यिक महत्त्व याविषयी विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रा. डॉ. प्रज्ञा कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात कविता ही समाजमनाला संवेदनशील बनविणारी आणि विचारांना दिशा देणारी प्रभावी साहित्यप्रकार असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी वाचन, लेखन आणि काव्यसादरीकरणाच्या माध्यमातून आपल्या सर्जनशीलतेला वाव द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. “वाचनातून विचार आणि भाषा समृद्ध होते. बोलीभाषेत लिहायला आणि बोलायला शिका. याच बोलीभाषेतून पुढे प्रमाणभाषेचा जन्म होत असतो,” असे त्यांनी नमूद केले.

श्रावणी कवी संमेलनासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळते आणि त्यांच्या साहित्यिक जाणिवा समृद्ध होतात, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी ज्ञानेश्वर पालवे (पत्रकार), राजेंद्र कटीलकर (कवी व व्यंगचित्रकार), मनोज वारघडे (कवी व पत्रकार), मच्छिंद्र बदादे (कवी), हेमंत सिंगडा (सामाजिक कार्यकर्ते), देवेंद्र वैद्य (कवी) तसेच प्रा. ज्योत्स्ना राव (कवयित्री) यांची विशेष उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. चांदोरे होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी साहित्य आणि कविता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन केले. कविता ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून सामाजिक वास्तवाचे भान देणारी आणि परिवर्तनाची प्रेरणा देणारी शक्ती आहे, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या भावना, अनुभव आणि विचारांना कवितेच्या माध्यमातून प्रभावीपणे अभिव्यक्त करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. जी. मेंगाळ यांचीही उपस्थिती लाभली.

कवी संमेलनात उपस्थित मान्यवर कवींनी सामाजिक, सांस्कृतिक, निसर्ग, मानवी जीवन तसेच समकालीन विषयांवरील विविध कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कविता सादर केल्या. त्यांच्या काव्यसादरीकरणाला उपस्थित मान्यवरांनी भरभरून दाद दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. के. के. पारधी यांनी केले, तर प्रा. टी. एम. पराडके यांनी उपस्थित मान्यवर, कवी, प्राध्यापक, विद्यार्थी आणि साहित्यप्रेमी यांचे आभार मानले.

महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेले हे १६ वे श्रावणी कवी संमेलन साहित्यप्रेमी, विद्यार्थी आणि मान्यवरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अत्यंत उत्साहपूर्ण व संस्मरणीय वातावरणात संपन्न झाले.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें