धरतरी माता मंदिरात 55 नवदुर्गांचे पूजन; कन्यापूजनातून संस्कृती, श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकीचा जागर

*संगमनगर येथे धरतरी ग्रामोन्नती सेवा संस्था व शिव बिरसा सेना, विक्रमगड तालुका यांच्या संयुक्त माध्यमातून भक्तिमय वातावरणात कार्यक्रम संपन्न*
विक्रमगड प्रतिनिधी : दिपक भोये पालघर
धरतरी ग्रामोन्नती सेवा संस्था आणि शिव बिरसा सेना, विक्रमगड तालुका यांच्या माध्यमातून आज संगमनगर येथील धरतरी माता मंदिरात 55 नवदुर्गांचे पूजन व कन्यापूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमातून नारीशक्तीचा सन्मान, संस्कृतीचे जतन आणि मुलींबद्दल आदरभाव व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना मधुकर मलकरी यांनी केली. यावेळी विशेष उपस्थिती म्हणून स्वप्ना बडगुजर, निकिता मेघवाली, मनस्विनी मलकरी, दुर्गा हरपाले, जयश्री खांजोडे, मनीषा ठाकूर, सुनीता वळवी, प्रतीक्षा तुंबडा आणि सुशीला पाटारा उपस्थित होत्या.
कन्यापूजनाच्या निमित्ताने नवदुर्गांना विविध शैक्षणिक साहित्य व उपयुक्त वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या.अवंती अभिजीत जोशी यांच्याकडून रायटिंग पॅड व कंपास बॉक्स, तर केतन शहा यांच्याकडून हातरुमाल भेट देण्यात आले.
याशिवाय तुषार टिळक, मनीष ठाकूर, सागर पराडे, गौरव लोहार, विजय मेघवाली, राकेशजी पुरोहित, हेमंत पुरोहित, बाळा पै आणि अरविंद रॉय यांच्याकडूनही विविध वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या.या उपक्रमातून मुलींच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासोबतच त्यांना प्रेम, सन्मान आणि प्रोत्साहन देण्याचा सुंदर संदेश देण्यात आला.
नवदुर्गांचे पूजन, कन्यापूजन आणि भेटवस्तू वितरणानंतर सर्व नवदुर्गांना महाप्रसाद देण्यात आला. उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.नवदुर्गांचा सन्मान म्हणजे नारीशक्तीचा सन्मान!अशा उपक्रमांमधून समाजात मुलींबद्दल आदरभाव वाढावा, सामाजिक एकोपा दृढ व्हावा आणि भारतीय संस्कृतीतील पूजनीय परंपरांचे जतन व्हावे, हा प्रेरणादायी संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
यावेळी धरतरी ग्रामोन्नती सेवा संस्था व शिव बिरसा सेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रमुख अतिथी तसेच बहुसंख्येने लहान मुली आणि महिला भगिनी उपस्थित होत्या.









