ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ; दिगंत स्वराज फाउंडेशनतर्फे घानवळ शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

मोखाडा / सचिन वझरे
आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी तसेच त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने दिगंत स्वराज फाउंडेशनच्या वतीने घानवळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते पाचवीतील तब्बल ६० विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती मर्यादित असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याचा खर्च पालकांसाठी अतिरिक्त आर्थिक भार ठरतो. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाला प्रत्यक्ष हातभार लावण्याचा प्रयत्न फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आला.
अंकित तिवारी, अनुपमा अग्रवाल, राजेंद्र मोमियाभाई आणि ज्योती अनंता घग या दात्यांच्या योगदानातून विद्यार्थ्यांना वह्या उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच घानवळ गावचे पेसा अध्यक्ष तथा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजचे पत्रकार मनोज वारघडे यांनी विद्यार्थ्यांना पेन, पेन्सिल व खोडरबरचे साहित्य उपलब्ध करून दिले. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी उपलब्ध शैक्षणिक संधींचा पुरेपूर उपयोग करून मन लावून शिक्षण घ्यावे आणि भविष्यात आपल्या कुटुंबाचे तसेच समाजाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन करण्यात आले. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी दानशूर व्यक्ती, संस्था आणि नागरिकांनी पुढे येऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे गरजेचे असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वाढ होण्यासोबतच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, विचार करण्याची क्षमता, विविध कौशल्ये आणि भविष्यात स्वतःच्या पायावर उभे राहण्याची क्षमता विकसित होते. त्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या उपक्रमासाठी शाळेच्या वतीने दिगंत स्वराज फाउंडेशन, दाते तसेच पत्रकार मनोज वारघडे यांचे कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आर्थिक व सामाजिक पाठबळ देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कविता मेधने आणि शिक्षक चरणसिंग राजपूत उपस्थित होते.










