Majha Gav Majha Shahr

साखरेत रंगला संस्कृती आणि कलेचा अनोखा मेळ; अबालवृद्धांच्या ठेक्यावर प्रेक्षक मंत्रमुग्ध :

  1. साखरे आदिवासी युवा मित्र मंडळाचा नवरात्रोत्सव; लावणीच्या ठसक्याने आणि फॅशन शोने फेडले डोळ्यांचे पारणे!

विक्रमगड :

तालुक्यातील साखरे येथील ‘आदिवासी युवा मित्र मंडळ’ आयोजित नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने भव्य सांस्कृतिक आणि फॅशन शोच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात साखरे गावातील आणि पंचक्रोशीतील अबालवृद्धांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होत आपल्या अंगभूत कलागुणांचे सादरीकरण केले. एकापेक्षा एक सरस ठरलेल्या या कार्यक्रमांनी उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. विशेष म्हणजे, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अतिशय चोख नियोजन करत हा संपूर्ण सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते गणपती बाप्पा आणि श्री शारदा मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर छत्रपती कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत सुमधुर अशा स्वागतगीताने उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. या सोहळ्याला उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

या सांस्कृतिक महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे फॅशन शो आणि लोककलांची जुगलबंदी. फॅशन शोच्या माध्यमातून स्पर्धकांनी आपली समृद्ध संस्कृती मंचावर जिवंत करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. तर दुसरीकडे, लोककला सादरीकरणादरम्यान लहान मुलांनी आणि युवा कलाकारांनी प्रसिद्ध लावणी नृत्यावर असा काही ठसकेबाज ठेका धरला की, संपूर्ण प्रेक्षागृह मंत्रमुग्ध झाले. कलाकारांच्या या उत्कृष्ट सादरीकरणावर खुश होऊन प्रेक्षकांनी त्यांच्यावर बक्षिसांची मोठी खैरात केली. प्रेक्षकांची झालेली प्रचंड गर्दी सांभाळत मंडळाने शिस्तीचे उत्कृष्ट उदाहरण लोकांसमोर ठेवले.

या दिमाखदार सोहळ्याला साखरे गावाच्या प्रथम नागरिक तथा सरपंच नीता वाघेरा, मंडळाचे अध्यक्ष तुळशीराम मौळे, विलास वाघेरा, जिवा वाघेरा, ईश्वर जाधव, सदू पवार, संतोष खुरकुटे आणि ग्रामपंचायत सदस्य रोहित गावित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्वच पाहुण्यांनी कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि मंडळाच्या उत्कृष्ट व नियोजनबद्ध व्यवस्थापनाचे जाहीर कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रमात परीक्षक म्हणून घुटे सर, राजेंद्र चौधरी सर आणि लोकेश वनमाळी सर यांनी चोख आणि उत्कृष्ट कामगिरी बजावली.

रविवारच्या महासोहळ्याकडे सर्वांचे लक्ष!

या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या सांस्कृतिक स्पर्धेचा अंतिम निकाल आणि बक्षीस वितरण विशेष सोहळा येत्या रविवारी आयोजित करण्यात आला आहे. साखरे पंचक्रोशीत आता ‘कोणत्या डान्स ग्रुपला आणि कलाकाराला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळणार?’ याची कमालीची उत्सुकता आणि आतुरता लागली आहे.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें