जिजाऊ निवासी शाळेत ‘जागतिक पांढरी काठी दिन’ उत्साहात; पांढरी काठी हातात धरून विद्यार्थ्यांनी काढली भव्य जनजागृती फेरी.

विक्रमगड (प्रतिनिधी):
‘जागतिक पांढरी काठी दिन’ संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याचेच औचित्य साधत जिजाऊ अंध व मतिमंद मुलांची निवासी शाळा, झडपोली येथे या विशेष दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात हेलन केलर आणि लुई ब्रेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध समाजसेवक श्री. भगवान सांबरे आणि संस्थेच्या अध्यक्षा सौ. भावनादेवी सांबरे यांची विशेष उपस्थिती लाभली होती. या वेळी मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून अंध व्यक्तींच्या जीवनात पांढऱ्या काठीचे नेमके महत्त्व काय असते, हे विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या शब्दांत समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली ती विद्यार्थ्यांनी काढलेली भव्य जनजागृती फेरी. स्वतःच्या हातात पांढरी काठी घेऊन व एका हातात घोषणा फलक घेऊन अत्यंत आत्मविश्वासाने विद्यार्थी या जनजागृती फेरीत सहभागी झाले होते. विविध प्रकारच्या घोषणा देत विद्यार्थ्यांनी काढलेल्या या फेरीने संपूर्ण परिसर प्रसन्न आणि प्रफुल्लित करून टाकला होता. फेरीदरम्यान शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत त्यांचा आत्मविश्वास वाढवला.
आपले मनोगत व्यक्त करताना शाळेतील विद्यार्थी साहिल भुजडे याने भावूक होत सांगितले की, “आमची ही काठी हेच आमचे तिसरे डोळे आहेत.” तर सयन पारधी या विद्यार्थ्याने, “जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे साहेबांमुळेच आम्हाला या शिक्षणरूपी प्रवासातून हे जग पाहण्याची आणि समजून घेण्याची नवी दृष्टी मिळाली आहे,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
या कौतुकास्पद सोहळ्याला जितेंद्र वाघ, महेश गायकवाड, भगवान सांबरे, भावनादेवी सांबरे, राम गोविंद, गुरुनाथ चौधरी यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









