साखरे येथे अंबेमातेचे भक्तिभावात विसर्जन; पारंपरिक तारपा नृत्य, खेळ आणि हरिपाठाने नवरात्रोत्सवाची सांगता!

_आदिवासी युवा मित्र मंडळाचा १९ वा नवरात्रोत्सव उत्साहात संपन्न; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ_
*विक्रमगड प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाड*
*विक्रमगड* : विक्रमगड तालुक्यातील साखरे येथे आदिवासी युवा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्रोत्सवाची दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अंबेमातेच्या भक्तिभावपूर्ण विसर्जनाने उत्साहात सांगता झाली. मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा १९ वा नवरात्रोत्सव नऊ दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांनी रंगला. पारंपरिक तारपा नृत्य, ढोल नाच, गरबा, दांडिया, भक्तिमय हरिपाठ आणि महाप्रसादाच्या आयोजनामुळे संपूर्ण गावात भक्तिमय व आनंददायी वातावरण निर्माण झाले होते.
विद्यार्थी, महिला आणि स्थानिक नागरिकांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे, तसेच आदिवासी संस्कृती आणि परंपरेचे जतन व्हावे, या उद्देशाने मंडळाच्या वतीने नऊ दिवस विविध खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गरबा, दांडिया, पारंपरिक ढोल नाच आणि आदिवासी संस्कृतीचे वैशिष्ट्य असलेल्या तारपा नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेतला. विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा रविवारी दिमाखदार बक्षीस वितरण सोहळ्यात गौरव करण्यात आला.
हरिपाठाने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला!
नवरात्रोत्सवादरम्यान साखरेसह पंचक्रोशीतील भाविकांनी अंबेमातेच्या दर्शनासाठी आणि पूजेसाठी मोठी गर्दी केली होती. सखाराम महाराज भोये यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या भक्तिमय हरिपाठामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी विधिवत होमहवन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.
दसऱ्याला ‘सोने’ लुटून ज्येष्ठांचे घेतले आशीर्वाद!
दसऱ्याच्या रात्री गावातील लहान-थोर मंडळी एकत्र आली. जुन्या आठवणींना उजाळा देत आणि गावाच्या सुख-समृद्धीची कामना करत पारंपरिक पद्धतीने ‘शिध सोने’ लुटण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी एकमेकांना सोन्याचे प्रतीक मानली जाणारी आपट्याची पाने देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच ज्येष्ठांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले. या परंपरेतून गावातील सामाजिक सलोखा, परस्पर आदर आणि बंधुभावाचे दर्शन घडले.
मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांचे मोलाचे योगदान
नऊ दिवस चाललेल्या या उत्सवादरम्यान कोणताही वाद किंवा तंटा न होता सर्व कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडले. उत्सव यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष तुळशीराम मौळे यांच्यासह नितीन चौधरी, सुनील वाघमारे, सचिन वाघमारे, किशोर पवार, भालचंद्र थोरात, शैलेश वाघेरा, विनोद वाघेरा आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच गावातील ग्रामस्थांनीही उत्सवाच्या आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.
साखरे येथील आदिवासी युवा मित्र मंडळाचा हा नवरात्रोत्सव केवळ धार्मिक सोहळा न राहता आदिवासी संस्कृतीचे जतन, पारंपरिक कलांना प्रोत्साहन, सामाजिक एकोपा आणि गावातील बंधुभाव वृद्धिंगत करणारा उत्सव ठरला. भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक वैभवाचा सुंदर संगम घडवणाऱ्या या उत्सवाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.









