
खाडा येथे खासदार – डॉ. हेमंत सवरा व आमदार – हरिश्चंद्र भोये यांच्या उपस्थितीत जनता दरबार संपन्न…
रामदास गाडर –
मोखाडा – दि. 28 फेब्रुवारी रोजी मोखाडा तहसीलदार कार्यालय येथे खासदार – डॉ. हेमंत सवरा व आमदार – हरिश्चंद्र भोये यांच्या उपस्थितीत जनता दरबार संपन्न झाला.
जनतेचे प्रश्न सुटावेत त्यांचा वेळ,श्रम आणि पैसा वाचावा यासाठी स्थानिक पातळीवर जनता दरबार होणे आवश्यक होते. तसेच जनता आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधून विकास कामे जलद गतीने व्हावीत या उद्देशाने खासदार डॉक्टर डॉ. हेमंत सवरा यांनी मोखाडा येथे जनता दरबाराचे आयोजन केले होते.
त्यांच्या या जनता दरबारामध्ये पिंपळपाडा-घानवळच्या प्रचंड दुर्घटनाग्रस्त रस्त्याच्या गंभीर तक्रारीसह एकूण 54 तक्रारी अर्ज दाखल करण्यात आल्या असून या प्रत्येक तक्रार अर्जावर संबंधित अधिकारी यांच्यासमोर त्या प्रश्नावर चर्चा घडवून आणण्यात आली. तसेच यातील प्रत्येक तक्रारीचा निपटारा करण्यासाठी यशस्वीपणे पाठपुरावा करा असे डॉ. सवरा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
जनता दरबार असल्याने तहसीलदार कार्यालय मोखाडा येथे सकाळपासूनच अधिकारी आणि जनता यांनी उपस्थिती दर्शवली होती ; मात्र दुसऱ्या एका नियोजित कार्यक्रमामुळे आमदार- खासदार यांना जनता दरबारास उपस्थित होण्यास थोडासा उशीर झाला होता. याबाबत खासदार डॉ. सवरा यांनी दिलगिरी व्यक्त केली. तसेच पुढील जनता दरबार आयोजित करायचा झाल्यास किमान 15 दिवस अगोदर जनतेस प्रशासमार्फत कळवण्यात यावे असं नागरिकांनी मत व्यक्त केले.
" जनता दरबार आयोजित केल्यामुळे ग्रामीण भागातील समस्या प्रामुख्याने पुढे आल्या असून त्या सोडवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देऊन त्यांचा पाठपुरावा केल्याचा लेखाजोखा तहसीलदार यांना सादर करण्यास सांगितले आहे. यापुढे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी नियमितपणे जनता दरबाराचे आयोजन करण्यात येईल."
- खासदार डॉ. हेमंत सवरा






