खरोंडा जि.प. शाळेत संगणक बेसिक प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन; ८० विद्यार्थ्यांची नोंदणी, ग्राम
स्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
*खरोंडा जि.प. शाळेत संगणक बेसिक प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन; ८० विद्यार्थ्यांची नोंदणी, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद* ….
विक्रमगड/पालघर प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाड माझं गावं माझं शहर
*खरोंडा पालघर (* ता. जव्हार) – जिल्हा परिषद शाळा खरोंडा येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून संगणक बेसिक प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, त्यांच्यात डिजिटल साक्षरता वाढावी आणि भविष्यातील शिक्षणासाठी त्यांना सक्षम बनवावे, या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत पिंपल्सचे सरपंच दिनेश जाधव उपस्थित होते. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश हांडवा, गणपत भेसकर, अंबादास कोंब, दीपक शेंडे (माजी विद्यार्थी), ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील नागरिकांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या संगणक प्रशिक्षण वर्गासाठी तब्बल ८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, गावात प्रथमच असा उपक्रम उन्हाळी सुट्टीत राबविण्यात येत असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, माजी विद्यार्थ्यांमधील अंजली दळवी आणि चेतन हांडवा हे दोघेही कोणतेही मानधन न घेता एक महिना विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण देणार आहेत. त्यांच्या या सामाजिक भावनेचे सर्वांनी कौतुक केले.
या प्रशिक्षण वर्गाचे नियोजन शाळेतील शिक्षक सुभाष टोपले सर यांनी केले असून, संगणकांची उपलब्धता व संपूर्ण उपक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक दशरथ तुंबडा सर यांनी केले आहे. विद्यार्थ्यांना संगणकाचे मूलभूत ज्ञान, टायपिंग, विविध शैक्षणिक उपयुक्तता तसेच डिजिटल साधनांचा वापर शिकविण्यात येणार आहे.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश हांडवा यांनी दानशूर व्यक्तींना आवाहन केले की, शाळेला अधिक संगणक उपलब्ध करून दिल्यास अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत या उपक्रमाचा लाभ पोहोचवता येईल.
प्रमुख पाहुणे सरपंच दिनेश जाधव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ग्रामपंचायत स्तरावर हा पहिलाच असा उपक्रम असून, याचा आनंद होत आहे. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन संगणकाचे ज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच उन्हाळी सुट्टीत असा उपक्रम राबविल्याबद्दल शिक्षकांचे अभिनंदन करत, भविष्यात शाळेला लागणारी सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी सुभाष टोपले सर यांनी उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ, महिला आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. या उपक्रमामुळे खरोंडा परिसरातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची नवी दिशा मिळणार असून, त्यांच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

स्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद








