वाडा येथे माकप-किसान सभेच्या नेतृत्वाखाली ५,००० शेतकऱ्यांचा मोर्चा…..
पालघर. *माझं गावं माझं शहर* वृत्तसेवा दिपक भोये
७ मे २०२६ रोजी वाडा येथे ५,००० शेतकऱ्यांचा जोरदार मोर्चा उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयावर धडकला आणि जमीनविषयक हजारो दावे सादर करण्यात आले. माकप व किसान सभेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चात पालघर जिल्ह्यातील वाडा आणि विक्रमगड या दोन तालुक्यांतील शेतकरी सहभागी झाले होते. या मोर्चात मोठ्या संख्येने महिला आणि युवक सहभागी झाले होते. सीटू, जमसं, डीवायएफआय, एसएफआय आणि आर्म यांनीही या मोर्चासाठी लोकांना उतरविले होते.
पाणी, सिंचन, वीज, रोजगार, शिक्षण, रेशन, रस्ते आदी जनतेच्या अनेक ज्वलंत स्थानिक प्रश्नांवरही नेत्यांनी आवाज उठवला. यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांनी ठोस आणि कालबद्ध आश्वासने दिली.
या मोर्चाचे नेतृत्व माकपच्या पॉलिट ब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे व मरियम ढवळे, केंद्रीय कमिटी सदस्य आमदार विनोद निकोले, राज्य सचिवमंडळ सदस्य किरण गहला व प्राची हातिवलेकर, राज्य कमिटी सदस्य चंदू धांगडा, जिल्हा कमिटी सदस्य अमृत भावर, ताई बेंदर, प्रकाश चौधरी, मनोज माढा, दिलीप गोतरणे, सुरेश वरठा व इतरांनी केले.










