जव्हार मधील कशिवली नं. १ येथे रानभाजी सण उत्साहात संपन्न

जव्हार प्रतिनिधी : जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत जुनीजव्हार पैकी पेसा गाव कशिवली नं. १ येथे वयम चळवळीच्या प्रेरणेने आज रानभाजी सण उत्साहात पार पडला. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या विविध रानभाज्यांचे महत्त्व, त्यांचे पारंपरिक ज्ञान आणि आरोग्यदायी उपयोग याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या रानभाजी सणाला प्रमुख पाहुणे म्हणून मनोज कामडी – तालुका पेसा व्यवस्थापक, पंचायत समिती जव्हार, तेजस पाटील – आकांक्षित प्रकल्प, पंचायत समिती जव्हार आणि दिपालीताई गोगटे – वयम चळवळीच्या कार्यकारी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांनी विविध प्रकारच्या रानभाज्या सादर केल्या. पारंपरिक पद्धतीने जतन केलेले रानभाज्यांचे ज्ञान पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे, स्थानिक जैवविविधतेचे संवर्धन करणे आणि रानभाज्यांचे आहारातील महत्त्व अधोरेखित करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी रानभाज्यांचे संवर्धन व पारंपरिक ज्ञानाचे जतन करण्याचे महत्त्व सांगितले. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग आणि महिलांचा सहभाग यामुळे रानभाजी सणाला विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
वयम चळवळीच्या माध्यमातून आयोजित या उपक्रमामुळे रानभाजी, स्थानिक अन्नसंस्कृती आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश ग्रामस्थांपर्यंत पोहोचला.










