Majha Gav Majha Shahr

जव्हार तालुक्यातील कोतीमाळ जि. प. शाळेत रानभाज्या मेळावा उत्साहात


पालघर (विक्रमगड)प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाड
पालघर /जव्हार (कोतीमाळ), दि. २५ ऑगस्ट २०२६ : जव्हार तालुक्यातील जि. प. शाळा कोतीमाळ येथे विद्यार्थ्यांना स्थानिक रानभाज्या, पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि जैवविविधतेची माहिती व्हावी, या उद्देशाने रानभाज्या मेळाव्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
या मेळाव्यास पिंपळशेत केंद्राचे केंद्रप्रमुख पाटील, त्यांचे सहकारी, माजी डहाणू गटशिक्षणाधिकारी राऊते, ग्रामपंचायतीचे सरपंच दिनेश जाधव, शाळेचे मुख्याध्यापक दिवे, शिक्षक गवळी, पालक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना रानभाज्यांचे महत्त्व, त्यातील आरोग्यदायी गुणधर्म तसेच स्थानिक परिसरातील पारंपरिक खाद्यसंस्कृती जतन करण्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी परिसरात आढळणाऱ्या विविध प्रकारच्या रानभाज्या मेळाव्यात आकर्षक पद्धतीने मांडल्या. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रानभाज्यांची नावे, त्यांचे उपयोग आणि पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या पाककृतींबाबत माहिती सादर केली. पालकांनीही मेळाव्यास उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.
सामाजिक कार्यकर्ते कमलेश पागी यांनी सांगितले की, “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील जैवविविधता, पारंपरिक ज्ञान आणि रानभाज्यांचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजते. स्थानिक ज्ञान पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी असे उपक्रम अत्यंत उपयुक्त आहेत.”
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणासोबतच आपल्या परिसरातील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीची प्रत्यक्ष ओळख झाली. उत्साहपूर्ण वातावरणात रानभाज्या मेळावा यशस्वीपणे पार पडला.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें