झडपोली येथील विशेष विद्यार्थ्यांनीच सांभाळली शाळेची धुरा
शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली शिक्षकांची भूमिका; आत्मविश्वास व कौशल्याचे घडले अनोखे दर्शन_

विक्रमगड प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाड
*विक्रमगड* : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या झडपोली, ता. विक्रमगड, जि. पालघर येथील जिजाऊ अंध व मतिमंद मुलांच्या निवासी शाळेत शिक्षक दिन अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन, आयोजन आणि सूत्रसंचालन शाळेतील विशेष विद्यार्थ्यांनीच केले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी सुमधुर स्वागतगीताने केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचे स्वतःच्या हाताने तयार केलेल्या गुलाबपुष्पांनी स्वागत करून त्यांचे आशीर्वाद घेतले.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थी स्वतः शिक्षक बनले होते. त्यांनी वर्गात जाऊन इतर विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनुभव घेतला. त्यानंतर आयोजित मुख्य कार्यक्रमात या विद्यार्थी-शिक्षकांनी मंचावर येऊन आपले अनुभव व्यक्त केले. “शिक्षकांचे काम किती कठीण असते आणि ते आपल्यासाठी किती कष्ट घेतात, याची जाणीव आज आम्हाला झाली,” अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्याने उपस्थित शिक्षक आणि कर्मचारी भावूक झाले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन शाळेतील विशेष विद्यार्थी साहिल भुजड याने अत्यंत आत्मविश्वासाने केले. त्याच्या आत्मविश्वासपूर्ण निवेदनाने उपस्थितांची दाद मिळवली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक महेश गायकवाड होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे आणि कार्यक्रमाच्या नियोजनाचे कौतुक केले. ते म्हणाले, “आमची ही विशेष मुले आज ज्या आत्मविश्वासाने शिक्षक बनली आणि त्यांनी ज्या पद्धतीने कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले, तो क्षण आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. शिक्षकांचे खरे समाधान विद्यार्थ्यांच्या या प्रगतीतच असते.”
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी सयन पारधी याने उपस्थितांचे आभार मानले. जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या या निवासी शाळेतील शिक्षक दिनाचा सोहळा शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच विशेष विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना आणि आत्मविश्वासाला वाव देणारा ठरला.
यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.










