झडपोलीत दिव्यांग बालगोपाळांचा जल्लोष; भक्तीमय वातावरणात फुटली दहीहंडी!

विक्रमगड प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाड
*विक्रमगड* : तालुक्यातील झडपोली येथील प्रसिद्ध ‘जिजाऊ नगरी’त कार्यरत असलेल्या जिजाऊ अंध व मतिमंद मुलांच्या निवासी शाळेत कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला सोहळा अत्यंत उत्साहात, भक्तिभावाने आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. समाजात अनेकदा उपेक्षित राहणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी पारंपरिक सणाचा मनमुराद आनंद घेत आपल्या सुप्त कलागुणांचे सुंदर दर्शन घडविले.
कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने शाळेत बालगोपाल श्रीकृष्णासाठी आकर्षक पाळणा सजविण्यात आला होता. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांनी सुरेल आवाजात हरिपाठ, पारंपरिक अंगाईगीत आणि पाळणागीत सादर करून संपूर्ण जिजाऊ नगरीचे वातावरण भक्तिमय करून टाकले.
या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते विद्यार्थ्यांचे पारंपरिक गवरी नृत्य. रात्रीच्या वेळी ढोलकीच्या तालावर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे नृत्य सादर केले. त्यांच्या उत्साहपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
रात्री बारा वाजता जिजाऊ संस्थेच्या अध्यक्षा सौ. भावनादेवी सांबरे (आई) आणि ज्येष्ठ समाजसेवक श्री. भगवान सांबरे (बाबा) यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीकृष्णाची महाआरती करण्यात आली. यावेळी सांबरे परिवाराने विद्यार्थ्यांसोबत कृष्णजन्माचा आनंद साजरा करून त्यांना आशीर्वाद दिले.
उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शाळेच्या प्रांगणात गोपाळकाला व दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. दिव्यांग मुला-मुलींनी एकत्र येत ‘बोल बजरंगबली की जय’ आणि ‘गोविंदा आला रे आला’ अशा उत्साहपूर्ण घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
दहीहंडी फोडण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य सादर केले. त्यानंतर या चिमुकल्या दिव्यांग गोविंदांनी जिद्द, उत्साह आणि आत्मविश्वासाने मानवी साखळी तयार करून मोठ्या उत्साहात दहीहंडी फोडली. दहीहंडी फुटताच विद्यार्थ्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह आणि आत्मविश्वासाचे भाव उमटले. दिव्यांग मुलांच्या कलागुणांना वाव देत त्यांना सण-उत्सवांचा आनंद घेण्याची संधी देणाऱ्या जिजाऊ संस्थेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.










