*राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्यावतीने बेरोजगारीविरोधात जव्हारमध्ये ‘एल्गार’; मोटारसायकल तिरंगा रॅलीतून शासनाचे लक्ष वेधले .

राज्यातील वाढती बेरोजगारी, रखडलेल्या शासकीय भरती प्रक्रिया आणि युवकांच्या विविध प्रश्नांकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने मंगळवारी जव्हार येथे ‘बेरोजगार हक्क एल्गार’ मोटारसायकल तिरंगा रॅली काढण्यात आली. माजी आमदार सुनील भुसारा आणि पालघर जिल्हाध्यक्ष प्रीतम (सनी) एकनाथ पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जव्हार, विक्रमगड, मोखाडा आणि वाडा तालुक्यांतील पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.
गोरवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयापासून रॅलीला सुरुवात झाली. राज्यातील रिक्त शासकीय पदांची तातडीने भरती करावी, पोलीस भरती प्रक्रिया वेगाने राबवावी, परीक्षा व भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांना आळा घालावा तसेच स्थानिक युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या.
भरती प्रक्रियेतील अनावश्यक विलंब दूर करून प्रत्येक जिल्ह्यासाठी रोजगारनिर्मितीचा ठोस कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणीही करण्यात आली. ‘तरुणांच्या हाताला रोजगार द्या’, अशा घोषणांनी तिरंगा रॅलीदरम्यान परिसर दणाणून गेला.
युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नांसोबतच स्थानिक विकासाच्या विविध प्रश्नांकडेही आंदोलनातून लक्ष वेधण्यात आले. स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती बंद करावी, आश्रमशाळांमधील सेंट्रल किचन पद्धत रद्द करून प्रत्येक आश्रमशाळेत स्वतंत्र स्वयंपाकगृह सुरू करावे, बोराळे-जामसर येथील १३२ केव्ही पॉवर हाऊस तातडीने सुरू करावे तसेच सर्व ग्रामीण भागातील खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशा मागण्या करण्यात आल्या.
‘युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,’ असा इशारा आयोजकांनी दिला.
या आंदोलनात जिल्हा निरीक्षक सतीश आसावरे, जिल्हाध्यक्ष प्रीतम (सनी) एकनाथ पवार, युवा नेते दयानंद भुसारा, जव्हार तालुका कार्याध्यक्ष सोनू दादा खुताडे, महिला अध्यक्ष मनीषाताई वाणी, माजी नगराध्यक्ष रश्मीन रियाज मणियार, युवक अध्यक्ष विनोद दादा मौळे, विद्यार्थी सेल तालुकाध्यक्ष राहुल दादा घेगड, आदिवासी सेल अध्यक्ष संजय भल्ला, लालू चव्हाण नगरसेवक, जिल्हा युवक कार्याध्यक्ष अधिब मुल्ला,मयूर केदार निष्ठावंत कार्यकर्ता, विद्यार्थी सेल उपाध्यक्ष रोहिदास वझरे, विद्यार्थी सेल जिल्हा सरचिटणीस अमित डोके, काशिनाथ भोये, मयूर घेगड, अंकुश घेगड, युवक उपाध्यक्ष विजय गावित, सेवा दल तालुका अध्यक्ष ईश्वर पवार, विद्यार्थी सेल अध्यक्ष सोशल मीडिया श्याम जाधव, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष विराज पाटील नगरसेवक, विक्रमगड तालुका अध्यक्ष रमेश दोडे,आदिवासी विभाग पालघर जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटकर, गुरुनाथ सहारे, जगदीश पागी, सोपान मेघवाली, भागेश भुसारा, सदानंद लाखन आदिवासी विभाग तालुका अध्यक्ष, तुषार वाघ, निखिल गायकवाड, बाळकृष्ण भोये, सेहबाज काजी, इम्रान शेख अल्पसंख्या शहर अध्यक्ष, अनिल रोंदे, राजेश चौधरी, अक्षता चौधरी यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी, आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
मोर्चादरम्यान पोलीस प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य करण्यात आले. युवकांच्या रोजगारासह स्थानिक विकासाच्या प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधत रॅलीची सांगता करण्यात आली.










