Majha Gav Majha Shahr

घानवळ शासकीय आश्रमशाळेत ‘स्वच्छ, सुंदर व निर्मल आश्रमशाळा’ अभियानाला सुरुवात!

२ ते १७ ऑक्टोबरदरम्यान विविध स्वच्छता उपक्रमांचे आयोजन; विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

मोखाडा | सचिन वझरे

आदिवासी विकास विभागांतर्गत आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी २ ते १७ ऑक्टोबरदरम्यान ‘स्वच्छ, सुंदर व निर्मल आश्रमशाळा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा घानवळ, ता. मोखाडा येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे, शाळा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवणे तसेच आरोग्यदायी वातावरण निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

 

अभियानाच्या माध्यमातून शाळा परिसर, वर्गखोल्या आणि वसतिगृहातील स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता आणि स्वच्छतेच्या सवयींचे महत्त्व पटवून दिले जात आहे.

 

स्वच्छता ही केवळ एक दिवसाची कृती नसून ती दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली पाहिजे, हा संदेश या अभियानातून देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय रुजविण्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत.

 

मुख्याध्यापक राजेंद्र बागले यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाचे नियोजन करण्यात आले. यावेळी अधीक्षक कल्पेश शिंदे, अधीक्षिका रेणुका कोडापे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

 

शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी आणि घानवळ टीमच्या सामूहिक सहभागातून ‘स्वच्छ, सुंदर व निर्मल आश्रमशाळा’ अभियान राबविण्यात येत असून, शाळा परिसर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें