साखरे येथे आंबेमातेचे वाजत-गाजत स्वागत; नवरात्रोत्सवाने गावात भक्तिमय वातावरण.
तारप्याच्या तालावर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत देवीचे आगमन; विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन.

*विक्रमगड प्रतिनिधी* – प्रशांत दाव्हाड
*विक्रमगड* : साखरे गावात नवरात्रोत्सवानिमित्त भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, आदिवासी मित्र मंडळ, साखरे यांच्या वतीने आंबेमातेचे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. तारप्याच्या तालावर, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि देवीच्या जयघोषात मातेचे आगमन झाल्याने संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
आदिवासी मित्र मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाही मंडळाने परंपरा जपत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. देवीच्या प्रतिष्ठापनेपूर्वी गावातील तरुण भक्तांनी विरार येथील प्रसिद्ध श्री जीवदानी देवी मंदिरापासून हातात पेटती मशाल घेऊन साखरे गावापर्यंत धाव घेत पवित्र ज्योत आणली. गावात या ज्योतीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर ज्योतीच्या माध्यमातून दीपप्रज्वलन करून विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली आणि आंबेमातेची प्रतिष्ठापना करण्यात आली.










