किनिस्ते येथे पद्मश्री भिकल्या धिंडा यांच्या नावाने सभामंडपाचे लोकार्पण
गरजूंना मदत केल्याने देणारा आणि घेणारा दोघांनाही समाधान मिळते – मा . सभापती प्रदीप वाघ

मोखाडा / सचिन वझरे
स्पार्क फाऊंडेशन आणि किनिस्ते ग्रामस्थांच्या संयुक्त पुढाकारातून जिल्हा परिषद केंद्र शाळा, किनिस्ते येथे उभारण्यात आलेल्या भव्य सभामंडपाचा लोकार्पण व नामकरण सोहळा उत्साहात पार पडला. या सभामंडपाला पद्मश्री पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ आदिवासी तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांचे नाव देण्यात आले. सभामंडपाचे उद्घाटन पद्मश्री भिकल्या धिंडा यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे होते. यावेळी बोलताना रानडे म्हणाले, “गरजूंना मदत केल्याने देणारा आणि घेणारा या दोघांनाही समाधान मिळते.” स्पार्क फाऊंडेशन योग्य ठिकाणी शैक्षणिक व सामाजिक उपयोगाच्या इमारती उभारण्याचे काम करीत असून, गरजू शाळांमधील पायाभूत सुविधांची कमतरता दूर करण्यासाठी संस्थेचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. किनिस्ते येथील सभामंडपाला पद्मश्री भिकल्या धिंडा यांचे नाव देण्यात आल्याने आदिवासी समाजाच्या कला आणि संस्कृतीचा गौरव झाला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप वाघ यांनी आपल्या मनोगतात पद्मश्री भिकल्या धिंडा यांच्या कार्याचा गौरव केला. सातत्यपूर्ण मेहनत आणि आदिवासी लोककलेप्रती असलेल्या निष्ठेच्या बळावर धिंडा यांनी पद्मश्री पुरस्कारापर्यंत मजल मारली. त्याचप्रमाणे उच्च शिक्षण घेऊन प्रशासकीय सेवेत मोठे पद मिळविणाऱ्या मनोज रानडे यांची उपस्थिती विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी या मान्यवरांच्या जीवनप्रवासातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन वाघ यांनी केले. सभामंडप उभारणीसाठी योगदान देणाऱ्या स्पार्क फाऊंडेशन आणि ग्रामस्थांचेही त्यांनी कौतुक केले.
किनिस्तेचे सरपंच योगेश दाते यांनी स्पार्क फाऊंडेशनचे आभार मानले. यावेळी फाऊंडेशनचे संचालक मकरंद दीक्षित यांच्या हस्ते पद्मश्री भिकल्या धिंडा यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला गटविकास अधिकारी प्रितेश नानकर, गटशिक्षणाधिकारी गीता मसराम (शहा), विस्तार अधिकारी सुनील पाटील, किरण शिंदे, महाले साहेब, गलंगे साहेब, पाणीपुरवठा अधिकारी बोर्डे, केंद्रप्रमुख, सूर्यमाळच्या सरपंच गीता पाटील, करोळचे सरपंच नरेंद्र येले, विष्णू हमरे, विठ्ठल गोडे, संजय वाघ, निलेश ठोमरे, किनिस्तेचे सुनील व्यापारी, उपसरपंच पंकज शिंदे, बाळकृष्ण शिंदे, कविता मडके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश शिंदे, मुख्याध्यापक कर्पे सर, ग्रामविकास अधिकारी धात्रक मॅडम, कोचाळा शाळेचे मुख्याध्यापक दिनकर फसाळे आणि वाकडपाडा हायस्कूलचे मुख्याध्यापक ठवरे यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच योगेश दाते यांनी केले. माजी सरपंच मंगेश दाते यांनी आभार मानले, तर गणेश वाघ यांनी सूत्रसंचालन केले.
सभामंडपाच्या उभारणीमुळे शाळेतील शैक्षणिक उपक्रमांसह ग्रामस्थांच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या सभामंडपाला पद्मश्री भिकल्या धिंडा यांचे नाव देण्यात आल्याने आदिवासी लोककलेच्या परंपरेचा सन्मान अधोरेखित झाला आहे.










