Majha Gav Majha Shahr

जाहिरातींच्या फलकांनी झाडांचा रोखला श्वास; वृक्षसंवर्धनाला धोका?

मोखाडा / सचिन वझरे  *माझं गावं माझं शहर वृत्तसेवा*

मोखाडा तालुक्यातील प्रमुख रस्त्यांलगत असलेल्या झाडांवर विविध शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस आणि व्यावसायिक आस्थापनांच्या जाहिरातींचे फलक मोठ्या प्रमाणावर लावले जात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. या फलकांमुळे झाडांचे नुकसान होत असून पर्यावरणप्रेमींनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

मे आणि जून महिन्यात शाळा, महाविद्यालये, नर्सिंग कॉलेज, एमएस-सीआयटी केंद्रे, संगणक प्रशिक्षण संस्था, विधी महाविद्यालये तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होत असते. विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी संस्था मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करतात. मात्र अनेक ठिकाणी जाहिरातींचे फलक थेट झाडांवर खिळे ठोकून किंवा दोऱ्यांनी घट्ट बांधून लावले जात असल्याने वृक्षांना इजा पोहोचत आहे.

पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, झाडांमध्ये खिळे ठोकल्यामुळे त्यांच्या खोडाला जखमा होतात. त्यामुळे रोगराई वाढण्याची शक्यता निर्माण होते. तसेच फलकांच्या वजनामुळे फांद्यांवर ताण येतो. काही ठिकाणी फलक लावताना झाडांच्या फांद्यांची तोडदेखील केली जाते. यामुळे नैसर्गिक वाढ खुंटून पर्यावरणाचे नुकसान होत आहे.

एकीकडे शासन आणि सामाजिक संस्था वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी जनजागृती करत असताना दुसरीकडे जाहिरातींसाठी झाडांचा वापर होत असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. झाडे ही केवळ नैसर्गिक संपत्ती नसून मानवाला प्राणवायू देणारी जीवनरेखा आहेत. त्यामुळे जाहिरातींसाठी झाडांचा वापर टाळून स्वतंत्र फलक, स्टँड किंवा अधिकृत जागांचा वापर करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

स्थानिक प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन झाडांवर जाहिराती लावणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच वृक्षसंवर्धनासाठी कठोर नियमांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांकडून होत आहे.

“आपल्या फायद्यासाठी आणि जाहिरातींच्या प्रसिद्धीसाठी मूक सजीवांवर (झाडांवर) होणारा एक प्रकारचा हा अत्याचारच आहे.

झाडांना लोखंडी खिळे अथवा तारांनी आवळल्याने त्यांना इजा होते. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी झाडे ओढू शकत नाहीत, म्हणून त्यांच्यावर अत्याचार करणे अनिंदनीय आहे.”

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें