जोरदार वादळीवाऱ्यासह पावसाने घानवळ गावातील अनेक कुटुंबाचे अतोनात नुकसान
खरपडे कुटुंबाचे पुन्हा यावर्षीही घराचे नुकसान; शासनाकडून मदतीची प्रतीक्षा

मोखाडा / सचिन वझरे माझं गावं माझं शहर वृत्तसेवा
मोखाडा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत हिरवे-घानवळ अंतर्गत येणाऱ्या घानवळ गावावर आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने थैमान घालत अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान केले आहे.
या वादळात गावातील रहिवासी नामदेव अर्जुन खरपडे यांच्या घरावरील पत्रे उडून गेले असून घरातील धान्य आणि इतर आवश्यक वस्तू भिजल्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. विशेष म्हणजे, या घटनेत खरपडे यांची मुलगी घरात असताना अंगावर पत्रा पडण्यापासून थोडक्यात बचावली, हे सुदैवच म्हणावे लागेल.
खरपडे कुटुंबीयांनी यावेळी तीव्र खंत व्यक्त केली. ते म्हणाले की, “मागील वर्षीही आमच्या घरावरील संपूर्ण छप्पर वादळाने उडवून नेले होते. पंचनामा होऊनही शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही. यावर्षी तरी आम्हाला नुकसानभरपाई मिळावी.”
एकाच कुटुंबावर दोन वर्षे सलग आलेल्या या संकटाने गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पीडित कुटुंबांनी शासनाने तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.










