Majha Gav Majha Shahr

जव्हार तालुक्यातील विशाल वळवी ‘ अल्ट्रा चॅम्पियन ’   १०० कि.मी. धावण्यात सुवर्ण झेप; पुणे मान्सून स्टेडियम रन स्पर्धेत प्रथम क्रमांक

माझं गाव माझं शहर वृत्तसेवा सचिन वझरे

पालघर जिल्ह्यातील जव्हारचा सुपुत्र तथा १०० किमी अल्ट्रा रनर आणि अल्ट्रा ट्रेल माऊंटन रनर विशाल शंकर वळवी यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनतीच्या जोरावर आणखी एक ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. पुणे येथे आयोजित ‘पुणे मान्सून स्टेडियम रन – २०२६’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अल्ट्रा रनिंग स्पर्धेत १०० किलोमीटर शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकावर नाव कोरले आहे.

२७ जून २०२६ रोजी बियॉन्ड माईलेज यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत विशाल वळवी यांनी अवघ्या ७ तास ९ मिनिटे ४४ सेकंदांत १०० किलोमीटरचे अंतर पूर्ण करत उपस्थितांना थक्क केले. स्टेडियमच्या ट्रॅकवर सलग २५० फेऱ्या पूर्ण करत त्यांनी अविश्वसनीय शारीरिक क्षमता, मानसिक ताकद आणि सातत्यपूर्ण वेगाचे दर्शन घडवले.

मान्सूनच्या दमट वातावरणात झालेल्या या कठीण स्पर्धेत विशाल यांनी ताशी सुमारे १४ किलोमीटरचा सरासरी वेग कायम ठेवत बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. त्यांच्या या दमदार कामगिरीमुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अल्ट्रा रनिंग क्षेत्रात त्यांची विशेष दखल घेतली जात आहे.

स्पर्धेनंतर रेस डायरेक्टर मुरलीकृष्णन पिल्लई यांच्या हस्ते विशाल वळवी यांना सुवर्णपदक आणि फिनिशर प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

या यशामागे अल्ट्रा १०० किमी प्रशिक्षक प्रमोद सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच विशाल राठी, सह्याद्री ट्रेकिंग ग्रुप आणि MH Trail Runners यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विशाल यांना धावपटू म्हणून घडवण्यात प्रशिक्षक शंकर चौधरी सर यांचे प्रारंभिक प्रशिक्षण आणि राजू गांगोड सर यांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले.

जव्हारसारख्या आदिवासी भागातून राष्ट्रीय स्तरावर अशी उल्लेखनीय कामगिरी करत विशाल शंकर वळवी यांनी पालघर जिल्ह्याचे नाव देशभर उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या सुवर्ण यशाबद्दल क्रीडा क्षेत्रासह विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पालघर जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात त्यांनी आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें