आदिवासी हायस्कूल, मो-हांडा येथे विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप

मोखाडा / सचिन वझरे माझं गावं माझं शहर वृत्तसेवा
आदिवासी हायस्कूल, मो-हांडा येथे गुरुवार, दि. १६ जुलै २०२६ रोजी विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय साहित्य वितरणाचा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात शंभर विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, परीक्षा पॅड, कंपास, वह्या, पेन व बिस्किटांचे मोफत वाटप करण्यात आले.
श्री शिवछत्रपती समाजसेवा मंडळ, जुचंद्र (ता. वसई, जि. पालघर) हे मंडळ सन २०१७ पासून आदिवासी हायस्कूल, मो-हांडा या विद्यालयाशी सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने विविध शैक्षणिक उपक्रम राबवत आहे. मंडळामार्फत विद्यालयाला मोफत वह्या, बेंच, नवीन इमारतीसाठी इलेक्ट्रिक फिटिंग, फळे, संगणक, लॅपटॉप तसेच दरवर्षी विविध शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.
यावर्षीही मंडळाच्या सहकार्याने विद्यालयातील १०० विद्यार्थ्यांना वह्या, पेन व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. तसेच श्री श्याम सत्संग परिवार गोकुळधाम सेवा ट्रस्ट, गोरेगाव (मुंबई) यांच्या वतीने १०० विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, परीक्षा पॅड व कंपासचे वितरण करण्यात आले. याशिवाय श्री शिवछत्रपती समाजसेवा मंडळाचे संस्थापक मा. श्री पुरुषोत्तम पाटील यांनी विद्यालयाला स्पीकर व माईक भेट देऊन विद्यालयाच्या शैक्षणिक उपक्रमांना मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमास श्री रामलालजी बगाडिया चॅरिटेबल ट्रस्ट, कफ परेड (मुंबई) चे सेवक श्री अनिल सिंग, श्री शिवछत्रपती समाजसेवा मंडळाचे संस्थापक मा. श्री पुरुषोत्तम पाटील, अध्यक्ष मा. श्री किरण म्हात्रे, मंडळाचे सदस्य श्री मेघनाथ पाटील, श्री धर्माजी म्हात्रे व सौ. विद्याताई भोईर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच विद्यालयाच्या स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य श्री काशीराम कडू व श्री अशोक पाटील यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक श्री अनिल सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक श्री हर्षवर्धन लढे यांनी केले, तर आभार प्रदर्शन स्कूल कमिटीचे सदस्य श्री अशोक पाटील यांनी मानले.
यावेळी आपल्या मनोगतात मा. श्री पुरुषोत्तम पाटील यांनी विद्यार्थ्यांना दररोज आई-वडिलांचा आशीर्वाद घ्यावा, त्यांच्या आज्ञेचे पालन करावे, शिक्षणासोबत विविध तांत्रिक (टेक्निकल) अभ्यासक्रमांचा लाभ घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करावा तसेच रोजगाराच्या नवीन संधींचा शोध घेत जीवनात यशस्वी व्हावे, असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
मंडळाचे अध्यक्ष मा. श्री किरण म्हात्रे यांनी आपल्या मनोगतात विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री अनिल सोनवणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व सहकार्यामुळे हे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे शक्य झाल्याचे नमूद केले. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देऊन उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून समाजातील दानशूर संस्था व व्यक्तींच्या सहकार्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठा आधार मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.










