जिजाऊ शाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; समर्पण सेवा चॅरिटेबल ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम

विक्रमगड प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाड माझं गावं माझं शहर वृत्तसेवा
*विक्रमगड* : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र संचलित जिजाऊ अंध व मतिमंद मुलांची निवासी शाळा, झडपोली (ता. विक्रमगड) येथे समर्पण सेवा चॅरिटेबल ट्रस्ट, मालाड यांच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत शाळेतील नऊ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ₹३,००० इतकी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. मान्यवरांचे शाल, गुलाबपुष्प आणि जिजाऊ संस्थेच्या कार्याची माहिती पुस्तिका देऊन स्वागत करण्यात आले. तसेच स्वागतगीत आणि ईशस्तवन सादर करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाची प्रस्तावना महेश गायकवाड यांनी मांडली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाचे महत्त्व पटवून देत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच जिजाऊ संस्थेच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या कार्याचे कौतुक करून संस्थेच्या उपक्रमांचे भरभरून अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समर्पण सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रमेश सावंत उपस्थित होते. यावेळी जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्यासह समर्पण सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी किशोर लट्टू, हरीश जालान, किशोर नार्वेकर, राजेश पाटील, संजय कार, शुभांगी लट्टू, गजेंद्र मंत्री उपस्थित होते. तसेच शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र वाघ, राम गोविंद, गुरुनाथ चौधरी, रामचंद्र भोरे, योगेश बोंड तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत भोये यांनी केले. शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला नवी प्रेरणा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.










