बोईसर ग्रामपंचायतीकडून रस्त्यांवरील अतिक्रमाणावर बुलडोझर कारवाई;

बोईसर शहरातील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या आणि रस्त्यांवरील व फुटपाथवरील बेकायदेशीर अतिक्रमाणांमुळे नियमित वाहतूक कोंडी, अपघात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत बोईसरने अतिक्रमाणाविरोधात कठोर भूमिका घेत ५, १२ आणि १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता विशेष निष्कासन मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे की, रस्ते आणि फुटपाथ हे नागरिकांसाठी असून त्यावर कोणाचेही अनधिकृत कब्जा सहन केला जाणार नाही.
अनेक ठिकाणी फुटपाथवर स्टॉल्स, हातगाड्या, दुकानांचे बाहेर आलेले शेड्स तसेच विविध साहित्य ठेवल्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला असून वाहतूक व्यवस्थेवरही गंभीर परिणाम होत आहे. या मोहिमेअंतर्गत अनधिकृत स्टॉल्स, हातगाड्या, दुकानांचे बाहेर आलेले शेड्स, फूटपाथ व्यापणारे साहित्य आणि इतर सर्व प्रकारच्या अतिक्रमाणांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीने सर्व व्यापारी, फेरीवाले, स्टॉलधारक आणि व्यावसायिकांना प्रशासकीय कारवाईपूर्वी स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याचे अंतिम आवाहन केले आहे. अन्यथा ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत अतिक्रमे हटवली जातील. तसेच कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या साहित्याचा खर्च, दंड आणि इतर सर्व आर्थिक जबाबदारी संबंधित अतिक्रमणधारकांवर टाकण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
ग्रामपंचायतीने बोईसरकरांनाही या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आवाहन केले असून, शहर सुंदर, स्वच्छ, सुरक्षित आणि शिस्तबद्ध करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे सहकार्य आवश्यक आहे. “रस्ते आणि फूटपाथ नागरिकांचे आहेत; त्यांच्यावर अतिक्रमण करणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही,” असा ठाम संदेश प्रशासनाने दिला आहे. सरपंच आणि उपसरपंच यांनी प्रसारमाध्यमांद्वारे या मोहिमेची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करत, “बोईसरच्या सुव्यवस्थित विकासासाठी ही कारवाई अपरिहार्य असून सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे,” असे नमूद केले आहे.










