Majha Gav Majha Shahr

सेवानिवृत्त सुभेदार भास्कर भाऊ राऊत यांचा जन्मभूमी बेरिस्ते गावात सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

मोखाडा / सचिन वझरे माझं गाव माझं शहर (वृत्तसेवा)

मोखाडा, दि. ०२ ऑगस्ट : कर्तव्याचा प्रवास संपतो, पण कर्तव्याची भावना कधीच संपत नाही. कर्तव्य म्हणजे जबाबदारी आणि जबाबदारी म्हणजे प्रामाणिकपणा, याची प्रचिती देणारे मोखाडा तालुक्यातील बेरिस्ते गावचे सुपुत्र सुभेदार भास्कर भाऊ राऊत हे भारतीय सैन्यातील तब्बल २८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर दि. ०१ ऑगस्ट २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले.

सुभेदार भास्कर भाऊ राऊत यांनी २९ जुलै १९९८ रोजी भारतीय सैन्यात प्रवेश केला. कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी सैन्यात विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. १५ जून २०११ रोजी ‘नायक’, तर ११ एप्रिल २०१५ रोजी ‘हवालदार’ या पदावर त्यांना बढती मिळाली. त्यानंतर २ नोव्हेंबर २०२१ रोजी ‘नायब सुभेदार’ या महत्त्वाच्या पदावर त्यांची नियुक्ती झाली. सेवाकाळात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावत ‘सुभेदार’ या पदापर्यंत मजल मारली.

                                                                                 सैन्यातील २८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर आपल्या जन्मभूमीत परतलेल्या सुभेदार भास्कर भाऊ राऊत यांच्या सन्मानार्थ बेरिस्ते गाव व पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने दि. ०२ ऑगस्ट २०२६ रोजी भव्य सेवानिवृत्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सुभेदार भास्कर भाऊ राऊत यांच्या सन्मानार्थ मोखाडा फाटा ते बेरिस्ते गावापर्यंत सुमारे १६ कि.मी. अंतराची भव्य बाइक रॅली काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि उत्साहपूर्ण वातावरणात त्यांचे गावात जंगी स्वागत करण्यात आले.

बेरिस्ते गावातील निवृत्ती समारंभाला सर्व स्तरातील नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. ग्रामस्थांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि पुष्पवृष्टी करून सुभेदार भास्कर भाऊ राऊत यांचा सन्मान केला.

या कार्यक्रमाला आमदार – हरिशचंद्र भोये, व्यावसायिक – संतोष चोथे यांच्यासह गावचे सुपुत्र माजी सैनिक प्रभाकर माळे (BSF), भारतीय सैन्य दलातील सैनिक हिरामण राऊत, त्यांचे भाऊ पोलीस कृष्णा राऊत, माजी सैनिक, पोलीस मित्र, हितचिंतक, मित्रपरिवार तसेच बेरिस्ते गाव व पंचक्रोशीतील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशसेवेला २८ वर्षे वाहून घेतलेल्या सुभेदार भास्कर भाऊ राऊत यांच्या सेवानिवृत्तीबद्दल ग्रामस्थांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें