देशभक्तीचा पावन गंध आणि लोकसहभागाचा सुवर्णयोग: कर्मवीर येथे स्वातंत्र्यदिनाचा सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न!

वसई / सचिन वझरे
स्वातंत्र्य म्हणजे केवळ एका पर्वाचा आरंभ नव्हे, तर तो राष्ट्राराधनेचा आणि बलिदानाचा अखंड यज्ञ असतो. याच भावनेला साजेसा, राष्ट्रीय अभिमान आणि लोकसहभागाचा अनोखा संगम घडवणारा स्वतंत्र भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन सोहळा ‘कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व एस. पी. जुनिअर कॉलेज, जूचंद्र’ येथे अत्यंत चैतन्यमय व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
या सोहळ्यात राष्ट्रीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम जूचंद्र गावातील उद्योजक, दिवंगत नरेंद्र कृष्णा म्हात्रे यांच्या धर्मपत्नी, सन्माननीय श्रीमती कुसुम नरेंद्र म्हात्रे यांच्या करकमळांतून संपन्न झाला. ध्वज उंच आकाशात फडकताना उपस्थितांच्या देशभक्तीचा पारा उंचावला. शासनाच्या नियमावलीनुसार राष्ट्रीय गीतानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीत, राज्यगीत, ध्वजगीत आणि “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र योग साधत, कै.नरेंद्र कृष्णा म्हात्रे यांच्या कुटुंबियांनी (सौ. वंदना नितीन भोईर, श्रीमती अश्विनी आकाश पाटील व श्री. सचिन नरेंद्र म्हात्रे) विद्यालयाच्या विकासासाठी १ लाख ५१ हजार रुपयांची सढळ हाताने देणगी दिली.इतकेच नव्हे तर, नवीन इमारतीत एक वर्गखोली बांधण्यासाठी येणारा संपूर्ण खर्च उचलण्याची घोषणा करत त्यांनी समाजसेभवेचा आदर्श प्रस्थापित केला. याशिवाय, कार्यक्रमाचे अतिथी श्री. धीरज आत्माराम पाटील यांनी नवीन इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक असणारा संपूर्ण मातीचा भराव विनामूल्य करून देण्याची घोषणा करत शैक्षणिक दातृत्वाचा नवाध्याय लिहिला.
गुणवत्तापूर्ण शिक्षण, उत्कृष्ट व्यवस्थापन आणि शिस्तीची समृद्ध परंपरा अखंडित राखत आपल्या विद्यालयाने ‘ISO 9001:2015 मानांकन’ संपादन केले आहे. सोहळ्याच्या विशेष सत्रात ISO संस्थेचे संस्थापकीय सदस्य श्री. महेश सोनार यांच्या शुभहस्ते ह्या मानांकनाचे प्रमाणपत्र विद्यालयाचे प्राचार्य तथा रायगड विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी श्री. विलासराव जगताप सर, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तमजी पाटील साहेब आणि रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य श्री. विनयजी पाटील साहेब यांना अत्यंत मानाने प्रदान करण्यात आले.या ऐतिहासिक यशात मोलाचे योगदान देणाऱ्या पर्यवेक्षिका सौ. कविता पाटील मॅडम, श्री. निलेश गवळी, श्री. विजय पाटील, श्रीम. मयुरी गावडे, सौ. मानसी साळुंखे, श्रीम. सविता कदम, सौ. प्रज्ञा घरत, स्मिता पाटील आणि श्रीम. प्रणिता रणदिवे यांच्या विशेष योगदानाचे ही कौतुक करण्यात आले. या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन सन्माननीय चंद्रकांतजी दळवी साहेब यांच्याकडूनही शाबासकीची थाप मिळाली.
विद्यार्थ्यांनी सादर केलेले शिस्तबद्ध संचलन आणि जुन्या इमारतीप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी लयबद्ध कवायत या सोहळ्याचे मोठे आकर्षण ठरली. या उत्कृष्ट सादरीकरणाकरीचे शिल्पकार ठरलेले श्री. वसावे आणि सौ. स्मिता पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
तसेच, याच मातीतील गुणवत्तेचा सुगंध जगभर पसरवणाऱ्या दोन कर्तृत्ववान भगिनींचा—एअर इंडियामध्ये ‘एअरक्राफ्ट मॅटेनन्स इंजिनियर’ म्हणून नियुक्त झालेल्या कु.केसर नित्यानंद पाटील आणि मर्चंट नेव्हीमध्ये ‘कॅडेट अधिकारी’ म्हणून रुजू झालेल्या कु. केतल नित्यानंद पाटील यांचा विद्यालय आणि तमाम जूचंद्रवासियांतर्फे सत्कार करण्यात आला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. मयुरी गावडे यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत आणि गोड शब्दांत केले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘आर्ट’ आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (Artificial Intelligence) यांच्या आधुनिक संगमावर आधारित केलेली उत्कृष्ट सजावट कौतुकास्पद ठरली, ज्यासाठी वर्गशिक्षिका सौ. प्रज्ञा घरत यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. विद्यालयाचे कलाशिक्षक श्री. फर्डे सर व पवन सर यांनी केलेल्या रेखीव व आकर्षक फलक लेखनाने कार्यक्रमाच्या सौंदर्यात भर घातली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात देशाच्या रक्षणासाठी प्राण अर्पण करणारे अमर शहीद जवान तसेच ज्ञात-अज्ञात देशबांधव, जे कालवश झाले, त्यांना मनोभावे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्राच्या रक्षणाचा संकल्प घेत या दिमाखदार सोहळ्याची सांगता झाली.
राष्ट्रसेवेचा हा प्रगल्भ वारसा आणि विद्यार्थ्यांचा हा अफाट उत्साह असाच चिरकाल टिकून राहो, हीच सदिच्छा!










