जव्हारच्या विशाल वळवीने बंगळुरूच्या ‘ दिव्यश्री नंदी हिल्स मान्सून रन -२०२६ ‘ मध्ये पटकावला प्रथम क्रमांक

माझं गाव माझं शहर वृत्तसेवा
जव्हार : दि. 12 ऑगस्ट, या ” विशाल ” आकाशावर कुणाचीच मक्तेदारी नाही.जो जिद्द आणि अथक परिश्रमाच्या जोरावर स्वतःला सिद्ध करेल, तोच या ” विशाल “आकाशात स्वतःचं अस्तित्व आणि जागा निर्माण करत असतो. अशाच प्रकारे जिद्द,चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर स्वतःला सिद्ध केलेले प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे विशाल वळवी आहे.
बंगळुरू येथील प्रसिद्ध नंदी हिल्सवर आयोजित ‘ दिव्यश्री नंदी हिल्स मानसून रन २०२६’ या आव्हानात्मक हिल रन स्पर्धेत जव्हार तालुक्यातील घिवंडा ( पिंपळपाडा )या दुर्गम आदिवासी गावातील युवा धावपटू विशाल वळवी याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.२१ किलोमीटर्सच्या हाफ मॅरेथॉनमध्ये त्याने अवघ्या १ तास १२ मिनिटे ५० सेकंदांत शर्यत पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे जव्हार तालुक्यासह पालघर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त सकाळी नंदी हिल्स परिसरातून शर्यतीला सुरुवात झाली. पाऊस, दाट धुके, निसरडे रस्ते आणि तीव्र चढ-उतार अशा प्रतिकूल परिस्थितीत धावपटूंना सुमारे ५३० मीटरची उंची पार करताना शारीरिक व मानसिक क्षमतांचा चांगलाच कस लागतो.
समुद्रसपाटीपासून १,४०० मीटरपेक्षा अधिक उंचीवरील या मार्गावर विशालने वेग, शारीरिक क्षमता, उत्कृष्ट धावण्याचे कौशल्य आणि मानसिक ताकदीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.
या स्पर्धेत २१ कि.मी. हाफ मॅरेथॉन व १० कि.मी. रनमध्ये देशभरातून ४,८०० हून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला. मर्यादित साधन-सुविधांमध्ये सराव करून प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर विशालने मिळवलेला हा विजय ग्रामीण व आदिवासी भागातील युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरला आहे.










