कातकरीपाड्यात तिसऱ्या वर्षी रानभाजी सण उत्साहात

जव्हार : जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत शिरोशी पैकी पेसा गाव कातकरीपाडा येथे यंदा तिसऱ्या वर्षीचा रानभाजी सण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वयम चळवळीचे संस्थापक तथा विश्वस्त मिलिंद थत्ते तसेच मध्यप्रदेश येथील सुरजीतजी उपस्थित होते. पाहुण्यांचे ग्रामस्थांनी पारंपरिक तारपा नृत्याच्या माध्यमातून उत्साहात स्वागत केले.
या रानभाजी सणामध्ये ग्रामस्थांनी परिसरात उपलब्ध असलेल्या २० पेक्षा अधिक विविध रानभाज्या आणल्या होत्या. यामुळे स्थानिक जैवविविधता, पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि रानभाज्यांचे महत्त्व अधोरेखित झाले.
कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुणे, ग्रामस्थ आणि उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले. अंगणवाडी सेविका योगिता कामडी, वयम चळवळीचे कार्यकर्ते देवेंद्र थोटगा यांच्यासह बहुसंख्य महिला, मुले व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पारंपरिक रानभाज्यांचे जतन, स्थानिक खाद्यसंस्कृतीचे संवर्धन आणि ग्रामस्थांमध्ये सामूहिक सहभागाची भावना वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा रानभाजी सण उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला.आजच्या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय वाघ यांनी केले.










