Majha Gav Majha Shahr

गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव म्हणजे उज्ज्वल भविष्याला प्रेरणेची नवी दिशा

घानवळ आश्रमशाळेत दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात

मोखाडा / सचिन वझरे

सा. माझं गाव माझं शहर वृत्तसेवा

घानवळ, ता. मोखाडा : आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती व पत्रकार संघ, मोखाडा तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, घानवळ येथे इयत्ता दहावीच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देणे, तसेच ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची जिद्द निर्माण करणे, हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थिनींनी स्वागतगीत व ईशस्तवन सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हेमंत वारघडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा मोखाडा तालुक्याचे माजी सभापती प्रदीप वाघ उपस्थित होते. यावेळी ज्ञानेश्वर पालवे, कवी व पत्रकार सुभाष सोनकांबळे, मंगेश दाते, रघुनाथ गांगुर्डे (महाराष्ट्र प्रबंधभूमी), अमोल टोपले (ठाणे वार्ता), पत्रकार सचिन वझरे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य भास्कर कोरडे, ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, घानवळ येथील इयत्ता दहावीच्या परीक्षेत शाळेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला.

– प्रथम क्रमांक : संजीवनी देवराम टोपले – ७४.८० टक्के

– द्वितीय क्रमांक : प्रतिमा पांडुरंग वाघ – ७४ टक्के

– तृतीय क्रमांक : नितीन संदीप म्हसे – ७१ टक्के

यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या यशामागे पालक, शिक्षक आणि शाळेचे मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

मान्यवरांनी दिला यशाचा मंत्र

कवी व पत्रकार सुभाष सोनकांबळे यांनी ग्रामीण कवितेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. आदिवासी समाजातील विविध क्षेत्रांत यश मिळविलेल्या व्यक्तींची उदाहरणे देत विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपले भविष्य घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.

ज्ञानेश्वर पालवे यांनी विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा संदेश दिला. रघुनाथ गांगुर्डे यांनी गोष्टीच्या माध्यमातून जीवनातील संघर्ष, मेहनत आणि यश यांचा सुंदर संदेश विद्यार्थ्यांना दिला.

प्रमुख पाहुणे प्रदीप वाघ यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या स्वप्नांना आणि ध्येयांना प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जाण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सहकार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आणि शाळेच्या विकासासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक संभाजी गंगदाडे यांनी केले, तर मनोज वारघडे यांनी प्रास्ताविक केले. शेवटी शाळेतील शिक्षकांनी उपस्थितांचे आभार मानले.

गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारामुळे विद्यार्थ्यांमध्ये नव्या उमेदीचा आणि आत्मविश्वासाचा संचार झाला. “यश केवळ गुणांमध्ये नसते; मोठे स्वप्न पाहून ते पूर्ण करण्याच्या जिद्दीत खरे यश दडलेले असते,” या प्रेरणादायी संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें