पीएमश्री शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, नंडोरे येथील
१४ वर्षांखालील मुलींच्या संघाने शानदार कामगिरी……
नंडोरे : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पालघर यांच्या वतीने आयोजित पालघर तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत पीएमश्री शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, नंडोरे येथील १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने शानदार कामगिरी करत सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावले. या दैदीप्यमान यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
दिनांक २६ सप्टेंबर २०२६ रोजी आदर्श विद्या मंदिर, केळवे, ता. पालघर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नंडोरे आश्रमशाळेच्या मुलींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघांवर मात केली आणि विजेतेपदावर आपले नाव कोरले. आदर्श विद्या मंदिर, केळवे या संघाने उपविजेतेपद मिळविले.
या यशस्वी संघाला शाळेचे क्रीडा प्रशिक्षक श्री. छगन माळगावी सर, श्री. विजय जाधव सर व श्री. विनोद तांबडा सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. विश्वास पावडे सर यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत त्यांच्या यशात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
खेळाडूंची मेहनत, जिद्द, चिकाटी, सांघिक भावना आणि प्रशिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यांमुळेच हे यश संपादन करता आले. सलग दुसऱ्या वर्षी मिळविलेल्या या विजयामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राहिली आहे.










