
माझं गाव माझं शहर वृत्तसेवा.
मोखाडा सचिन वझरे.
मानवनिर्मित वणवा विझवून पोशेरा गावच्या आदिवासी तरुणांनी केले पर्यावरणाचे रक्षणसचिन वझरे मोखाडा ग्रामीण – पावसाळा संपल्यावर वातावरणातील उष्णतेमुळे हिवाळ्यात जंगलात सर्वत्र मोठया प्रमाणात वाळलेलं आहे.त्यामुळे एक आगीची ठिणगी देखील मोठ्या प्रमाणावर जंगलाची राख रांगोळी करण्यासाठी पुरेशी असते.
सध्या अपवादात्मक परिस्थिती सोडली तर निसर्गात नैसर्गिक वणवे कमी आणि कृत्रिम वणवे लग्नाचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. यामध्ये सर्वात जास्त म्हणजे विडी – सिगारेटचे व्यसन असलेले महाशय हौसेपोटी किंवा तलप आली की विडी – सिगारेट ओढून आगीच्या ठिणग्या असलेला उर्वरित भाग अतिशय बेजबाबदारपणे रस्त्याच्याकडेला गवतात फेकून देतात आणि मग आगीचा भडका होऊन शेकडो एकर जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडते.
या कृत्रिम वणव्यामुळे जनावरांचा चारा, शेतीसाठी आवश्यक गवत, औषधी वनस्पती आणि वनसंपदा, प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास आणि शेतकऱ्यांचे सरपण यांची तर हानी होतेच शिवाय वातावरणात मोठया प्रमाणावर धूर जमा होऊन हवा देखील प्रदूषित होते. त्यामुळे हवा प्रदूषणाने प्राणी आणि मानवी आरोग्य अत्यंत प्रभावित होते. पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या बेजबाबदार माणसांना आणि त्यांच्या मानसिकतेला बदलणे कठीण असले तरी निसर्गाचे संरक्षण करण्यासाठीची पोशेरा सारख्या गावातील आदिवासी तरुणांची भूमिका मात्र नक्कीच स्तुत्य अशीच राहिली आहे. मोखाडा तालुक्यातील पोशेरा गावच्या तरुणांना आपल्या गावच्यामागे म्हणजेच मोखाडा – नाशिक राज्य महामार्गावर पोशेरा गावच्या पुढे दोन कि.मी. वळण रस्त्यावर आग लागून धूर निघत असल्याचे दिसले. तरुणांनी कुठलाही विलंब न करता आपल्या मोटार सायकली घेवून घटनास्थळ गाठून आग विझवली. मात्र पुन्हा पुढे काही अंतरावर घाट आणि वळण रस्त्याच्याकडेला आग आणि धुराचे लोट दिसले. वारा जोराचा सुटल्यामुळे कृत्रिम वणवा लागलेल्या आगीचा भडका इतका प्रचंड होता की आगीला नियंत्रित करणे खूपच अवघड होते. त्यामुळे तरुणांनी अधिक सुरक्षितता म्हणून आगीच्या पुढे जाऊन गवत कापून टाकले आणि एक विना गवताची वाट तयार केली. याशिवाय तरुणांनी झाडाच्या फ़ांद्या- डहाळे आगीच्या ज्वालांना मारून मोठया शर्थीने कृत्रिम वणवा आटोक्यात आणला. ज्या वणव्यामुळे कित्येक एकर जंगल राख- रांगोळी झाले असते अशा मानवनिर्मित वणव्याला नियंत्रित केल्यावर तरुणांनी सुटकेचा निःश्वास टाकला. या पर्यावरणाच्या संरक्षण आणि मानवनिर्मित वणव्याला विझवण्याकामी रुपेश दरोडा, नरहरी दरोडा,हितेश आचारी, प्रमोद आचारी,दत्तात्रय आचारी, यादव आचारी,निलेश खुताडे, गणेश कोरडे, सदानंद पाटील, सुरेश रडे या पोशेरा गावच्या आदिवासी तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. तसेच घटनास्थळाच्या रस्त्याने प्रवास करणारे शिक्षक – रामदास गाडर यांचे देखील विशेष सहकार्य लाभले. पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या या सर्व तरुणांच्या स्तुत्य कामगिरीचे पोशेरा गाव – पंचक्रोशीतील नागरिक, पर्यावरण प्रेमी यांच्याकडून तसेच समाज माध्यमांवर कौतुक होत आहे.





