Majha Gav Majha Shahr

कळमगावात “स्वप्नातील गाव” उपक्रमाचा शुभारंभ; लोकसहभागातून विकासाला नवी दिशा

मोखाडा / सचिन वझरे माझं गावं माझं शहर वृत्तसेवा 

मोखाडा तालुक्यातील कळमगाव येथे स्वदेस फाऊंडेशन, शासन आणि ग्रामस्थांच्या संयुक्त सहभागातून राबविण्यात येणाऱ्या “स्वप्नातील गाव” उपक्रमाची उत्साहपूर्ण सुरुवात झाली. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थ, महिला, युवक आणि गाव विकास समिती यांनी एकत्र येत विविध विकासकामांचा श्रीगणेशा केला.

उपक्रमाच्या प्रारंभी गाव सुशोभीकरण, स्वच्छता मोहीम, सार्वजनिक ठिकाणांचे सौंदर्यीकरण आणि ग्रामविकासाचे नियोजन या कामांना गती देण्यात आली. तसेच, गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या “सहभागी ग्रामीण मूल्यांकन” (पीआरए) प्रक्रियेचाही प्रारंभ करण्यात आला. या प्रक्रियेद्वारे गावातील उपलब्ध संसाधने, स्थानिक गरजा, समस्या आणि विकासाच्या संधी यांचा ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून सखोल अभ्यास करण्यात येत आहे.

कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी ग्रामस्थांनी पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करून मान्यवरांचे उत्साहात स्वागत केले. गावाच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असून सामूहिक प्रयत्नांतूनच विकासाची उद्दिष्टे साध्य होऊ शकतात, असा संदेश यावेळी देण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संतोष चोथे, अक्षय पगार, अमोल जोशी, हिरामण मौळे, रमेश बंजारा आणि कौस्तुभ कांबळे उपस्थित होते.

मान्यवरांनी लोकसहभागाच्या बळावर “स्वप्नातील गाव” ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

“स्वप्नातील गाव” या संकल्पनेअंतर्गत स्वच्छ, सुंदर, स्वस्थ, साक्षर, समृद्ध आणि सृष्टी या सहा ‘स’च्या तत्त्वांवर आधारित आदर्श गाव उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. शासन, स्वदेस फाऊंडेशन आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयातून कळमगाव विकासाचा नवा आदर्श निर्माण करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या उपक्रमामुळे गावाच्या विकास प्रक्रियेत लोकसहभाग अधिक बळकट होणार असून कळमगाव भविष्यात इतर गावांसाठी प्रेरणादायी आणि आदर्श गाव म्हणून ओळख निर्माण करेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें