बोईसर पूर्व भागातील वीज समस्यांविरोधात ग्रामस्थांचा एल्गार; महावितरणला मागण्यांचे निवेदन.
बोईसर पूर्व भागातील वीज समस्यांविरोधात ग्रामस्थांचा एल्गार; महावितरणला मागण्यांचे निवेदन
**बोईसर (२१ एप्रिल २०२६): माझं गावं माझं शहर वृत्तसेवा. खुशाल जैन
बोईसर पूर्व परिसरातील वीज पुरवठ्याच्या विस्कळीत कारभारामुळे त्रस्त झालेल्या स्थानिकांनी आज महावितरणच्या बोईसर उपविभागावर धडक दिली. परिसरातील गंभीर वीज समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या शिष्टमंडळाने उपकार्यकारी अभियंता श्री. वैष्णव यांची भेट घेतली आणि मागण्यांचे लेखी निवेदन सादर केले.
गेल्या काही दिवसांपासून बोईसर पूर्व भागात वीजपुरवठ्याच्या समस्यांनी गंभीर रूप धारण केले असून, रहिवाशांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात रहिवाशांनी खालील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:
* **कर्मचाऱ्यांची कमतरता:** बोईसर पूर्व भागात लाइनमनची मोठी कमतरता भासत आहे. परिणामी, वीज दुरुस्ती आणि देखभाल (Maintenance) वेळेवर होत नाही. त्यामुळे तातडीने पुरेशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.
* **अमर जवान पेट्रोल पंप परिसरातील समस्या:** मान भागातील अमर जवान पेट्रोल पंपासमोरील गल्लीत वादळामुळे तुटलेली ३-फेज वीज वाहिनी अजूनही सिंगल फेजवर सुरू आहे. या तांत्रिक बिघाडामुळे येथे वारंवार फ्युज उडणे आणि वीज पुरवठा खंडित होणे असे प्रकार घडत आहेत, जे त्वरित दुरुस्त करणे गरजेचे आहे.
* **वारंगडे आणि चुरी पाडा येथील वीज वाहिनीचे स्थलांतर:** मौजे वारंगडे आणि चुरी पाडा भागात जंगलातून जाणारी वीज वाहिनी वारंवार बिघडत आहे. देखरेख सोपी व्हावी आणि भविष्यात स्ट्रीट लाइटची सुविधा मिळावी, यासाठी ही वाहिनी मुख्य रस्त्यावरून नेण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
* **जीर्ण वीज खांब:** बोईसर पूर्व, मान, साईनगर आणि दांडी पाडा परिसरात वीज वाहून नेणारे खांब अत्यंत जीर्ण झाले आहेत. हे खांब कधीही कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते, त्यामुळे हे खांब त्वरित बदलण्याची मागणी करण्यात आली आहे.
**आंदोलनाचा इशारा**
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, जर या समस्यांचे निराकरण वेळेत झाले नाही, तर आगामी २ मे रोजी पालघर येथील मुख्य अभियंता कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल.
यावेळी सागर बसवत , खुशाल जैन , मुकेश पवार सत्यम मिथिलेश मिश्रा, शैलेश भुतकड़े, पवन गुप्ता, भूषण पाटिल आणि वेद चव्हाण यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते.










