पेठ तालुक्यातील बोंडारमाळ गावात लग्नातील मानपान प्रथा बंद…
ग्रामस्थांच्या स्तुत्य निर्णयाचे होतेय सर्वत्र कौतुक
माझं गावं माझं शहर वृत्तसेवा सचिन वझरे.
मोखाडा : वाढती महागाई आणि लग्नकार्यात होणारा अनावश्यक मानपान खर्च टाळण्यासाठी पेठ तालुक्यातील बोंडारमाळ गावातील ग्रामस्थांनी मानपान प्रथा बंदचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे गावात मानपानात होणारा वाढता खर्च टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय ठरला आहे.
ही प्रथा बंद केल्याने आर्थिक साक्षरता वाढून लग्नकार्यात होणाऱ्या अनावश्यक खर्चाची बचत होणार आहे. वधू-वर कुटुंबातील आई-वडिलांच्या डोक्यावरचा खर्चाचा बोजा कमी होऊन बचत होणाऱ्या पैशांत मुला-मुलींच्या शिक्षणासाठी खर्च भागविणार आहे. त्यामुळे कर्जामुळे बेजार झालेल्या कुटुंबांना दिलासा मिळून आर्थिक शिक्षण होऊन न आलेल्या सुशिक्षित मुला-मुलींच्या प्रमाणात वाढ होऊन गाव पूर्णपणे साक्षर बनणार आहे, अशी अपेक्षा स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार या गावातील निर्णयाचे पेठ तालुक्यातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
“बदललेल्या जीवनशैलीत लग्नकार्य म्हणजे लाखोचा अनावश्यक खर्च होतो. बोंडारमाळ गावातील ग्रामस्थांनी लग्नकार्यात मानपान वाटप बंदीचा घेतलेला निर्णय योग्य आहे.”
— रतन पाटील, सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत आंबे
पेठ तालुक्यातील बोंडारमाळ या ७० घर असलेल्या गावात जेवढे ३५० लोकसंख्या आहे. गावात रोजगार नसल्याने गावातील ग्रामस्थ रोजगारासाठी शेजारील तालुक्यात स्थलांतरित होतात. रोजगारातून मिळणाऱ्या पैशांत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गावाने लग्नकार्यात मानपान बंदीचा घेतलेला निर्णय योग्य आहे.
— हिरामण गाड, पोलिस पाटील, बोंडारमाळ
लग्नकार्य म्हणजे दीड-चार लाखांचा अनावश्यक खर्च होत होता. त्यामुळे आमच्या गावात ग्रामस्थांनी मानपान बंदीचा निर्णय घेतला आहे.
— जितू पाटील, ग्रामस्थ, बोंडारमाळ










