कै. नारायण वड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सार्वजनिक तळे परिसरात वृक्षारोपण

पालघर प्रतिनिधी – सौरभ कामडी
विक्रमगड : श्रमजीवी संघटना महाराष्ट्र राज्य, पालघर जिल्हा उपाध्यक्ष अंकुश वड (दादा) यांनी आपल्या वडिलांचे कै. नारायण तुळशीराम वड (बाबा) यांच्या दशविधी कार्यक्रमानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश देत सार्वजनिक तळे, नांदगाव येथे वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम राबविला.
यावेळी सार्वजनिक तळ्यालगत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. आपल्या वडिलांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात आणि पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागावा, या भावनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी अंकुश वड यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “बाबा, तुम्ही आज आमच्यात नसलात तरी प्रत्येक कडक उन्हात या झाडांची थंड सावली आम्हाला तुमची आठवण करून देईल. आयुष्याच्या वाटेवर चालताना जेव्हा मी दमलो, तेव्हा झाडाच्या सावलीसारखे माझे बाबा मला आधार द्यायचे. आज ते नसले तरी या झाडांची प्रत्येक फांदी त्यांच्या मायेची जाणीव करून देईल. बाबा, तुमची खूप आठवण येईल. तुम्ही नेहमी माझ्या हृदयात असाल.”
या वृक्षारोपण उपक्रमात अंकुश वड यांचे सहकारी मित्र, गावकरी, नातेवाईक, हितचिंतक तसेच ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून वृक्षलागवड केली. उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करताना अंकुश वड यांनी या उपक्रमात साथ दिलेल्या प्रत्येकाचे ऋणी असल्याची भावना व्यक्त केली.
कै. नारायण वड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राबविण्यात आलेला हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला असून, पर्यावरण संवर्धनासोबतच आपल्या प्रिय व्यक्तींच्या स्मृती जपण्याचा एक आदर्श संदेश समाजासमोर ठेवणारा ठरला.










