जीव मुठीत धरून प्रवास! मोखाड्यातील मोरीचापाडा पुलासमोरील प्रचंड खड्ड्यांनी वाढवला अपघातांचा धोका; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष

मोखाडा / सचिन वझरे माझं गाव माझं शहर (वृत्तसेवा)
मोखाडा तालुक्यातील मोरीचापाडा पुलासमोरील मुख्य रस्त्यावर पडलेले प्रचंड खड्डे वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरत असून नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. गेल्या उन्हाळ्यापासून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर या खड्ड्यांची तीव्रता आणखी वाढली असून संपूर्ण रस्ताच खड्डेमय झाला आहे.
हा रस्ता मोखाडा–जव्हार, मोखाडा–नाशिक आणि मोखाडा–कसारा या तीन महत्त्वाच्या मार्गांना जोडणारा असल्याने दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, रुग्णवाहिका तसेच मालवाहतूक करणारी वाहने या मार्गावरून प्रवास करतात. त्यामुळे या रस्त्याचे महत्त्व अधिक असून त्याची तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक आहे.
पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचत असल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही. परिणामी दुचाकीस्वारांचे संतुलन बिघडून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. पुलासमोरील हा भाग विशेषतः धोकादायक बनला असून वाहनचालकांना वेग कमी करून अत्यंत सावधगिरीने वाहन चालवावे लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत अनेकदा संबंधित विभागाकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्यापही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
रस्त्याची झालेली दुरवस्था केवळ वाहनांचे नुकसान करत नाही, तर प्रवाशांच्या जीवितालाही धोका निर्माण करत आहे. पावसाळ्यात परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवावेत, पुलासमोरील धोकादायक भागाची त्वरित दुरुस्ती करावी आणि या महत्त्वाच्या मार्गावर सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.










